लातूर : लातुरात व्हॉलिबॉलचे उच्च दर्जाचे खेळाडू आहेत. मात्र, इनडोअर मैदान नसल्याने या खेळाडूंचा हिरमोड होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी इनडोअर मैदान गरजेचे आहे. हा विषय ‘लोकमत’ने गुरुवारी मांडल्यानंतर पालकमंत्र्यांनी याची दखल घेऊन कोणत्या योजनेतून हे काम करता येईल, याची चाचपणी करण्याच्या सूचना जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गुरुवारी ‘लोकमत’ने ‘लातूरला हवे व्हॉलिबॉलचे इनडोअर मैदान’ या मथळ्याखाली इनडोअर मैदानाची व्यथा मांडली होती. त्याची तत्काळ दखल घेत पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांना मैदान उभारणीसाठी चाचपणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे व्हॉलिबॉलपटूंच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. लातूर जिल्हा पासिंग व्हॉलिबॉल असोसिएशनने पालकमंत्र्यांसह महापौर व जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांना याविषयीचे पत्र दिले. त्यात क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये व्हॉलिबॉलचे इनडोअर मैदान आहे. मात्र, याठिकाणी व्हॉलिबॉलपटूंना सरावाला व स्पर्धेला संधी मिळत नाही, असे नमूद करून लातूरच्या व्हॉलिबॉलपटूंना शहरातील मध्यवर्ती ठिकाणी व्हॉलिबॉलची मुला-मुलींसाठी दोन स्वतंत्र मैदाने उपलब्ध करून द्यावीत, असे जिल्हा सचिव दत्ता सोमवंशी यांनी पत्राद्वारे कळविले आहे. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनीही जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करून मैदान कसे उभे करता येईल, याची चाचपणी केली. एकंदरित, ‘लोकमत’च्या वृत्ताने व्हॉलिबॉलसाठी इनडोअर मैदानाच्या हालचालींना सुरुवात झाली आहे.
अद्ययावत मैदान खेळाडूंना तारणार...
प्रत्येक खेळात अद्ययावत तंत्र येत आहे. कुस्तीसह खो-खो, कबड्डी मॅटवर आली आहे. त्यामुळे हे तंत्र त्या खेळाडूंना स्वीकारावे लागले. व्हॉलिबॉल पूर्वीपासूनच इनडोअर खेळ आहे. मात्र, आजतागायत जिल्ह्यात हा खेळ आऊटडोअरवरच खेळला जातो. जिल्ह्यात इनडोअर मैदान उपलब्ध झाल्यास नक्कीच लातूरचे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जातील, यात शंका नाही.