जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तो रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियम अधिक कडक केले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रेणापूर नगरपंचायतीच्या हद्दीतील पिंपळफाटा दर शुक्रवारी आठवडी बाजार भरतो. या ठिकाणी परिसरातील खेड्या-पाड्यातून शेतकरी, व्यापारी, नागरिक येतात. शुक्रवारी पिंपळफाटा येथील आठवडी बाजार सुरू असल्याची माहिती नगरपंचायत व पोलीस ठाण्याला देण्यात आली. तेव्हा दोन्ही विभागाकडून केवळ तोंडी आदेश देण्यात आले. मात्र, कसलाही दंड अथवा आठवडी बाजार बंद करण्यात आला नाही. अखेर तहसीलदारांना ही माहिती मिळताच तहसीलदार राहुल पाटील यांनी स्वतः रस्त्यावर उतरून आठवडी बाजार बंद केला. तसेच नगरपंचायतीला त्याची माहिती दिली.
नगरपंचायतीला नोटीस बजावणार...
जिल्हाधिकाऱ्यांनी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशाची नगरपंचायत प्रशासन अंमलबजावणी करीत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्यावर कर्तव्यात कसूरची केल्याची कारवाई का करू नये, अशी नोटीस बजावणार असल्याचे तहसीलदार राहुल पाटील यांनी सांगितले.