जिवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल
लातूर : संगनमत करून पार्टीसाठी घेऊन जाऊन फिर्यादीला शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्यांनी व काठीने कमरेवर मारहाण करण्यात आली, तसेच कत्तीने हनुवटीवर मारून जखमी करण्यात आले व जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी फिर्यादी तुकाराम हुलाप्पा गोणशेटे (रा. हुडगेवाडी, ता. चाकूर) यांच्या तक्रारीवरून श्रीनिवास टोपरपेसह सोबत असलेल्या तिघा जणांविरुद्ध चाकूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
लोहारा शेतशिवारातून बसची चोरी
लातूर : लोहारा शेत शिवारात लक्झरी बस (क्र. एमएच ०४ ईव्ही २२९९) पार्किंग करण्यात आली होती. ११ ते १२ जानेवारीदरम्यान अज्ञात चोरट्यांनी सदरील लक्झरी बस चोरून नेली. याप्रकरणी हैदर अब्दुल खादर चौधरी (३४, रा. उदगीर) यांच्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. शिंदे करीत आहेत.
बसवेश्वर महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन
लातूर : शहरातील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाइन पद्धतीने प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. उपस्थितीचे आवाहन प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे, डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ. शिवप्रसाद डोंगरे, डॉ. संजय गवई आदींसह प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी केले आहे.
राज्य संघटकपदी ज्ञानेश्वर औताडे
लातूर : येथील सहशिक्षक ज्ञानेश्वर औताडे यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण, प्रदूषण निवारण मंडळाच्या राज्य संघटकपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल आबासाहेब मोरे, विकास पाटील यांनी त्यांचा नियुक्तीपत्र देऊन सत्कार केला. औताडे यांनी वृक्षलागवड, ऊर्जा संवर्धन, व्यसनमुक्ती आदी विषयांवर जनजागृती केली आहे. या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.