पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहविलगीकरणातील कोरोना बाधित रुग्णांनी शासकीय यंत्रणेकडे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मागणी केली तर संबंधित नाममात्र शुल्क आकारून उपलब्ध करून द्यावे. कोरोनाची सद्यस्थिती आणि संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम असली पाहिजे. याकरिता यंत्रणेने त्यांना आवश्यक असलेले साहित्य व उपकरणांची माहिती तात्काळ सादर करावी. सदरील साहित्य, उपकरणे व औषधी नियमानुसार राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर खरेदी करून ठेवणे शक्य होणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांना अधिक दर्जेदार आरोग्य सुविधा देता येतील.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील डॉक्टरांनी कोरोनाबाधित रुग्णांना गरज असेल तर तात्काळ व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. कोणत्याही रुग्णांची प्रशासनाने व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले नाही, अशी तक्रार पुढील काळात येणार नाही, याची दक्षता घ्यावी. लातूर मनपाने दिल्लीच्या धर्तीवर शहरात मोहल्ला क्लिनिक निर्माण करावेत. शहरातील गरजू रुग्णांना त्यांच्या गल्लीमध्ये उपचार मिळतील, अशी व्यवस्था करावी.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याच्या सूचना
उदगीर उपजिल्हा रुग्णालयामध्ये ५ आणि निलंगा उपजिल्हा रुग्णालयात दोन व्हेंटिलेटर आरोग्य विभागाने उपलब्ध करून द्यावेत, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत ३० व्हेंटिलेटर उपलब्ध करावेत तर ग्रामीण रुग्णालयासाठी एक व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्यावा, यासाठी व्हेंटिलेटर खरेदी मागणीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत. जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांनी शंभर, जिल्हा शल्य चिकित्सकांनी शंभर आणि विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेने ४० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन खरेदीसाठी कार्यवाही करावी, अशी सूचना पालकमंत्री देशमुख यांनी केली.
सहा महिने पुरेल इतका औषधी साठा
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने पुढील सहा महिने पुरेल इतका औषधी साठा उपलब्ध करून ठेवावा. जेणेकरून रुग्णांची संख्या वाढल्यास त्यांना तात्काळ औषधी पुरवठा करणे शक्य होईल, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी ४० व्हेंटिलेटर राज्यस्तरावरून खरेदी करून मिळावीत, अशी मागणी केली.