लातूर शहरात जांभळाची आवक
लातूर : शहरात सध्याला जांभळाची आवक माेठ्या प्रमाणावर वाढली आहे. परिणामी, भावही घसरले आहेत. या जांभळांना ग्राहकांतून माेठी मागणी आहे. शहरातील फळबाजार, गंजगाेलाई, बार्शी रस्त्यावरील रयतू बाजार, राजीव गांधी चाैक, रेणापूर नाका, पाच नंबर चाैक या ठिकाणी जांभळांची विक्री केली जात आहे. ग्रामीण भागातून गेल्या आठ दिवसांत माेठ्या प्रमाणावर जांभळांची आवक हाेत आहे. त्यामुळे प्रतिकिलाेचे भावही घसरले आहेत.
कल्पनानगर परिसरात धूरफवारणी
लातूर : शहरातील कल्पनानगर, विक्रमनगर, विशालनगर भागात डासांचे प्रमाण वाढत आहे. परिणामी, धूरफवारणी करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून हाेत आहे. गेल्या आठ दिवसांपासून या भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सायंकाळच्या सुमारास डासांचे प्रमाण अधिक असते. परिणामी, नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. धूरफवारणी करण्याची मागणी हाेत आहे, मात्र याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत असल्याचा आराेप नागरिकांतून हाेत आहे.
चाकूर-वाढवणा रस्त्याची दुरवस्था
लातूर : जिल्ह्यातील चाकूर ते वाढवणा पाटी या २० किलाेमीटर रस्त्याची माेठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांसह स्थानिक नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून हाेत आहे. मात्र, याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे. दुरुस्तीच्या नावाखाली थातूरमातूर काम केले जात असल्याने, दर सहा महिन्याला रस्त्याची स्थिती जैसे थे राहत आहे.