औसा तालुक्यातील लामजना, तपसे चिंचोली, मोगरगा, जावळी, जोगन चिंचोली, उत्का, अपचुंदा, चलबुर्गा या परिसरात मृगाच्या प्रारंभापासून पाऊस होत आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या असून, ८० टक्के शेतकऱ्यांचा कल हा सोयाबीनवर आहे. २० शेतकरी तूर, उडीद, मुगाची पेरणी करीत आहेत.
डिझेलचे दर वाढल्यामुळे ट्रॅक्टरच्या पेरणीचा दरही वाढला आहे. कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन घोषित केल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली असताना बी-बियाण्यांसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरी खरीप पेरणीच्या कामामध्ये मग्न झाले आहेत. सध्या बाजारपेठेत नामांकित कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्यांची टंचाई जाणवत आहे. खासगी कंपन्यांच्या बियाण्यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे खर्च वाढला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आहे, ते ट्रॅक्टरद्वारे पेरणी करीत आहेत. काही शेतकरी बैलजोडीच्या आधारे पेरणी करीत आहेत.