क्रीडा संकुलात स्वच्छतेची मागणी
लातूर : शहरातील जिल्हा क्रीडा संकुलात धूरफवारणीसह स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव असल्याने या ठिकाणी स्वच्छतेसह ॲबेटिंग मोहीम राबवावी, अशी मागणी खेळाडू, नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. सकाळ, सायंकाळच्या सत्रात क्रीडा संकुलात गर्दी असते. याच वेळेत डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे परिसरात ॲबेटिंगसह धूरफवारणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मतदार याद्या दुरुस्ती सुरू करावी
लातूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुढील काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या दुरुस्ती करावी, अशी मागणी तहसीदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. स्थलांतर मतदारांची नावे स्थलांतरित ठिकाणी करावी, मयतांची नावे वगळावी, प्रभागनिहाय मतदार याद्या तयार कराव्यात, १८ वर्षांवरील तरुण मतदारांचे अभियान सुरू करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.