लातूर : जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग, आरोग्य विभाग व सर्व पंचायत समित्यांच्या संयुक्त प्रयत्नाने जिल्ह्यातील एकूण ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रांवर ४५ वर्षांपुढील एकूण ४ हजार १०८ दिव्यांगासाठी मंगळवारी आणि बुधवारी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे दिव्यांगांचे लसीकरण वेगाने होणार आहे. राज्यात सर्व दिव्यांगांसाठी विशेष मोहीम राबविणारा लातूर जिल्हा आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी दिली.
या लसीकरणासाठी समाजकल्याण विभागाकडून समन्वयासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येकी २० लाभार्थ्यांमागे एक कर्मचारी आहे. सर्व ग्रामीण रुग्णालयातही दिव्यांगांसाठी विशेष कक्ष स्थापन करुन लसीकरणाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी कळविले आहे.
या मोहिमेचा दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषद उपाध्यक्षा भारतबाई साळुंके, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे. लसीकरणासाठी दिव्यांग बांधवांनी स्वत:चे आधारकार्ड, युडीआयडी कार्ड यासह उपस्थित राहावे, असे आवाहन आरोग्य व बांधकाम सभापती संगीता घुले यांनी केले आहे.