लातूर : सोयाबीन बियाणे उत्पादक शेतकऱ्यांची दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत महाबीज कंपनीकडून लूट होत आहे. बाजारात सोयाबीनचे दर सात हजार रुपयांवर पोहोचलेले असताना महाबीज कंपनी मात्र बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार शंभर रुपये याप्रमाणे दर देत आहे. एक तर महाबीज कंपनीने बाजारभावाप्रमाणे शेतकऱ्यांना सोयाबीनला दर द्यावा किंवा शेतकऱ्यांनी पिकवलेले सोयाबीन त्यांना परत द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
महाबीजकडून दरवर्षी बियाणे तयार करण्यासाठी ठराविक शेतकऱ्यांना बांधावर मार्गदर्शन करून त्यांना अपेक्षित पद्धतीने मशागत करून घेतात. सदरील सोयाबीन खरेदीचा करार केला जातो. काढणीनंतर संबंधित शेतकरी महाबीज कंपनीच्या गोदामात सोयाबीन आणून देतात. त्यावेळी वजन करून ७० टक्के रक्कम दिली जाते. बियाणांची उगवण क्षमता तपासणी करून सदरील बियाणे चाळणी करून घेतले जाते. यावर्षी खरीप हंगामात महाबीजने शेतकऱ्यांना पाच हजार १०० रुपये प्रति क्विंटल दर करार करून घेतला. आता त्याचे माप केले जात असून, चाळणीतून गाळलेले बियाणे परत दिले जात आहे. सध्या बाजारात सोयाबीनचा दर सात हजार रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. त्यामुळे महाबीज कंपनीने शेतकऱ्यांना चालू बाजार भावाप्रमाणे पैसे द्यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महाबीज व्यवस्थापकाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल, जिल्हाध्यक्ष अरुण कुलकर्णी, युवा जिल्हाध्यक्ष नवनाथ शिंदे उपस्थित होते.
बियाणेपेक्षा मातेरे महाग...
महाबीज कंपनीने आमच्याकडून घेतलेल्या बियाणांची चाळणी करून मोजणी सुरू केली आहे. त्यात चाळून निघणारे मातेरे बाजारात सात हजार रुपये प्रति क्विंटलने विक्री होत आहे. बियाणं म्हणून एक नंबर सोयाबीन पाच हजार १०० रुपयाने घेतले जात आहे. यात आमचे क्विंटलला जवळपास दोन हजारांचे नुकसान होत आहे, महाबीजने चालू बाजार भाव द्यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल यांनी दिला आहे.