जळकोट : तालुक्यात २५ दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने खरिपातील उडीद, मुगासह सोयाबीनचा पालापाचोळा होत आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहे. यंदाचा हंगाम हातचा जाणार की काय, अशी भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. यामुळे त्यांची चिंता वाढली आहे.
डोंगरी असलेल्या जळकोट तालुक्यातील बहुतांश जमीन ही हलक्या प्रतीची आणि मुरमाड आहे. यंदाच्या खरिपात तालुक्यात २५ हजार हेक्टरवर पेरा झाला असून, त्यापैकी १० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा आहे. उर्वरित क्षेत्रावर कापूस, ज्वारी, तूर, उडीद, मूग, सूर्यफुल अशी पिके आहेत. यंदा वेळेवर आणि चांगला पाऊस झाल्याने चांगले उत्पादन मिळेल, अशी आशा होती. पिकेही चांगली बहरली होती. परंतु, तीन आठवड्यांपासून पावसाने गुंगारा दिल्याने खरीप पिके वाळत आहेत. त्यामुळे पिकांचा पालापोचाळा होत आहे.
जळकोट महसूल मंडलात आतापर्यंत ५२७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पीक वाळत असल्याने प्रशासनाने तत्काळ पंचनामे करुन हेक्टरी २५ हजारांची नुकसानभरपाई द्यावी, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, वीजबिल माफ करावे, अशी मागणी माजी सरपंच सुभाष बोधले, जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे, उपसरपंच सत्यवान पांडे, गोविंद केंद्रे, खादरभाई लाटवाले, बालाजी आगलावे, शिवानंद देशमुख, नागनाथ धुळशेट्टे, काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, गोपाळकृष्ण गबाळे, ॲड. तात्या पाटील, संग्राम नामवाड, संग्राम कदम, अयुब शेख आदींनी केली आहे.