लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर अनंतपाळ : तालुक्यात मृग नक्षत्रात दमदार पाऊस झाल्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेळेवर सुरुवात झाली. परंतु, मध्येच पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे पेरण्यांची गती मंदावली होती. त्यानंतर दमदार पाऊस झाल्यामुळे पुन्हा पेरण्यांना वेग आला. एकूण लागवड क्षेत्राच्या २८ हजार ५०० हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यंदा खरिपाचा पेरा १०३ टक्क्यांवर पोहोचला आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्यात ३४ हजार ७०० हेक्टर जमीन असली, तरी त्यापैकी केवळ २९ हजार ७०० हेक्टर जमीन ही लागवडीयोग्य आहे. खरीप हंगामाच्या पेरणीसाठी यंदा २८ हजार ३८४ हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले होते. मृग नक्षत्राच्या मुहुर्तावर पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. परंतु, मध्येच पावसाने ‘ब्रेक’ दिल्यामुळे पेरण्यांची गती मंदावली होती. दरम्यान, आठ दिवसानंतर पुन्हा चांगला पाऊस पडला. त्यामुळे मंदावलेल्या पेरण्यांची गती पुन्हा वाढली. एकूण लागवड क्षेत्राच्या २८ हजार ५१० हेक्टर्सवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. यंदा खरीप हंगामातील पेरण्यांची टक्केवारी १०३ टक्क्यांवर पोहोचली आहे.
सर्वाधिक सोयाबीनचा पेरा...
शिरूर अनंतपाळ तालुका सोयाबीन उत्पादनात मराठवाड्यात अव्वल असल्याने प्रत्येक वर्षी तालुक्यातील सोयाबीनचे क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे यंदाच्या २८ हजार ५१० हेक्टरपैकी सर्वाधिक म्हणजे २३ हजार ७५५ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. एकूण लागवड क्षेत्राच्या ९० टक्के क्षेत्रावर सोयाबीनचे पीक घेण्यात आले आहे.
४ हजार ७५५ हेक्टरवर इतर पिके...
शिरूर अनंतपाळ तालुक्यात खरीप हंगामाच्या पेरण्या २८ हजार ५१० हेक्टरवर करण्यात आल्या असल्या, तरी त्यापैकी २३ हजार ७५५ हेक्टरवर सोयाबीनचे पीक तर उर्वरित ४ हजार ७५५ हेक्टरवर इतर पिके घेण्यात आली आहेत. यामध्ये ज्वारी ८१ हेक्टर, मका ५३ हेक्टर, मूग ३२३ हेक्टर, उडीद १५६ हेक्टर, तुरीचा ४,१३२ हेक्टरवर पेरा झाला आहे.