येथील कोविड केअर सेंटर आणि ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेटेड हेल्थ सेंटरला भेट देऊन पाहणी केली. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मीकांत केंद्रे उपस्थित होते. सध्या ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त ३० खाटांचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील बाह्यरुग्ण, दाखल रुग्ण सेवा चापोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर सोपविण्यात आली आहे. परिणामी, शहरातील रुग्णांची हेळसांड होत असून, आरोग्य सुविधांपासून ते वंचित आहेत. त्यामुळे कृषी महाविद्यालयातील कोरोना सेंटरमध्ये ऑक्सिजनयुक्त १०० खाटांचा स्वतंत्र विभाग सुरू करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देशमुख यांनी दिले. त्यासाठी लागणारे साहित्य आणि निधीची उपलब्धता येत्या चार ते पाच दिवसांत पूर्ण करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
कोरोना सेंटरमध्ये ऑक्सिजन खाटांचा स्वतंत्र विभाग सुरू होताच ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना पूर्ववत रुग्ण सेवा सुरू करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यावेळी डेडिकेटेड हेल्थ सेंटरमधील रुग्णांशी चर्चा केली. त्यांच्या नातेवाइकांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या. कृषी महाविद्यालय येथील कोरोना सेंटरमधील रुग्णांची चौकशी केली. तेथील डॉक्टर, परिचारिका, सुरक्षा कर्मचाऱ्यांना काही सूचना केल्या.