लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : जिल्ह्यात लसींचा पुरवठा सुरळीत होत असून, दररोज ९ हजार ५०० हून अधिक नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत ७ लाख १२ हजार ३८२ नागरिकांना लस देण्यात आली असून, यापैकी ५ लाख ४९ हजार ६७२ जणांनी पहिला तर १ लाख ६२ हजार ७१० नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. दरम्यान, जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढला असून, तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांचा लस घेण्यासाठी प्रतिसाद दिसून येत आहे.
नोंदणीनंतर लगेच मिळाला डोस
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असला तरी लसीकरण गरजेचे आहे. त्यामुळे लसीकरण करून घेतले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर तत्काळ लस मिळाली. ८४ दिवसांनंतर दुसरा डोस दिला जाणार असून, कोरोना नियमांचे पालन करीत आहे.
- हृषीकेश महामुनी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना गैरसोयींचा सामना करावा लागला. त्यामुळे कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीचा डोस घेतला. दुसरा डोसही पूर्ण झाला आहे. लस फायदेशीर असून, प्रत्येकाने ती घ्यायलाच पाहिजे. लसीकरण झाले असले तरी प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.
- बालाजी जाधव
लसीकरणाला मिळतेय गती
जिल्ह्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स यांना प्राधान्याने प्रथम आणि द्वितीय डोस देण्यात आला आहे. तर १८ ते ४४, ४५ ते ६० आणि ६० पेक्षा जास्त वयोगटासाठीही लसीकरण मोहीम राबविली जात आहे. २५० हून अधिक केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरू असून, लसीचा पुरवठा सुरळीत झाला असल्याने नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. १८ ते ४४ वयोगटांतील १ लाख २४ हजार ७०४, ४५ ते ६० वयोगटातील १ लाख २९ हजार १४७ तर ६० पेक्षा अधिक वयोगटातील १ लाख ४० हजार ६९० जणांनी पहिला डोस घेतला आहे. तसेच १८ ते ४४ वयोगट २१०६, ४५ ते ६० वयोगट ३६ हजार ८७९ आणि ६० पेक्षा अधिक वयोगटातील ५३ हजार ६६७ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
२५० हून अधिक केंद्रांवर लसीकरण
जिल्ह्यातील लातूर, औसा, निलंगा, चाकूर, जळकोट, शिरूर अनंतपाळ, उदगीर, अहमदपूर, रेणापूर, देवणी या तालुक्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर लसीकरण सुरू आहे. दररोज २५० हून अधिक केंद्रांवर लस दिली जात असून, नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.