तालुक्यात ग्रामीण रुग्णालय व पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. या ठिकाणी आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजेन तपासणी केली जाते. शनिवारपर्यंत रॅपिड अँटिजेनच्या कीट उपलब्ध होत्या. मात्र, काही आरोग्य केंद्रात कोविड चाचणीच्या कीट संपल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. शनिवारपर्यंत तालुक्यात १३ हजार ४३७ रॅपिड, तर ११ हजार ६७ आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यात ४ हजार ३४३ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शहरी भागात २ हजार ४५, तर ग्रामीण भागात २ हजार २९८ पॉझिटिव्ह आढळून आले.
सध्या तालुक्यात १ हजार ३६० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यातील ३२ जणांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. ते येथील ग्रामीण रुग्णालय व दोन खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. आरोग्य विभागाकडून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात आला असून, त्यानुसार ग्रामीण भागात कोविड चाचणी करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. मात्र, सध्या ग्रामीण रुग्णालयात चाचणी कीट थोड्याफार प्रमाणात आहेत. आरोग्य केंद्रात कीट शिल्लक नाहीत.
दरम्यान, आतापर्यंत ७ हजार ५०० जणांना लसीकरण करण्यात आले आहे. सर्वच आरोग्य केंद्रांत लस पुरविण्यात आली होती. मात्र, सध्या लसींचा डोस शिल्लक नसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. जिल्हास्तरावरून पुरवठा झाला नसल्याने तुटवडा निर्माण झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
दोन दिवसांत लस उपलब्ध होईल...
सध्या ग्रामीण रुग्णालयात कोविड चाचणी कीट उपलब्ध आहेत. त्याद्वारे आम्ही चाचण्या करीत आहोत. आरटीपीसीआर कीट उपलब्ध नाहीत. याबाबत जिल्ह्याकडे मागणी नोंदवली आहे. येत्या दोन दिवसांत मुबलक प्रमाणात चाचणी कीट व लसी उपलब्ध होतील, असे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी सांगितले.