लोकमत न्यूज नेटवर्क
निलंगा : तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला असून, त्यात स्थानिक नेतेमंडळींना धक्का देत मतदारांनी तरुणाईला पसंती दिली आहे. तालुक्यात भाजप, काँग्रेसला मतदारांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे.
कासारशिरशी ग्रामपंचायतीमध्ये आमदार अभिमन्यू पवार यांचे समर्थक असलेले पंचायत समिती सदस्य जिलानी बागवान यांच्या पॅनेलचा पराभव झाला. विद्यमान जिल्हा परिषद उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके यांच्या अंबुलगा बु. गटातील ८ पैकी ७ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातूरे यांच्या पत्नी संतोषीबाई लातूरे यांचा बालकुंदा ग्रामपंचायतीत पराभव झाला आहे. तसेच भाजपचे तालुकाध्यक्ष शाहुराज थेटे यांच्या तगरखेडा येथील पॅनेलचा पराभव झाला आहे. होसूर येथील भाजप जिल्हा संघटक तानाजी बिरादार यांच्या पॅनेलला मतदारांनी नाकारले. याठिकाणी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रमोद कदम यांचा विजय झाला आहे.
हासुरी गटाच्या सदस्या अरूणा बरमदे यांच्या पॅनेलचा पराभव झाला असून, भाजपचे जेष्ठ सावरी येथील कुमार पाटील यांनी विजय मिळवला आहे. शिऊर ग्रामपंचायतीमध्ये भाजप अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष अमीर पटेल यांच्या पॅनेलचा विजय झाला. लांबोटा येथे दहा वर्षांपूर्वी बिनविरोध ग्रामपंचायत आणलेल्या भाजपचे कट्टर समर्थक लालासाहेब देशमुख यांच्या पत्नीला व त्यांच्या पॅनेलला पराभव पत्करावा लागला. त्याच गावातील काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य महेश देशमुख यांच्या पॅनेलचा विजय झाला. विशेष म्हणजे महेश देशमुख व लालासाहेब देशमुख हे पंचायत समिती निवडणुकीत आमने-सामने होते. तेव्हाही महेश देशमुख यांनी लालासाहेब देशमुख यांचा पराभव केला होता.
हाडगा येथील सर्वपक्षीय पॅनेलचे प्रशांत वाघमारे यांच्या पॅनेलचा विजय झाला असून, त्याठिकाणी काँग्रेसचे तानाजी डोके यांचा पराभव झाला आहे. तालुक्यातील लक्षवेधी असलेल्या औराद शहाजानी ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे मोहन भंडारे यांनी आपली अनेक वर्षांची सत्ता कायम ठेवत दणदणीत विजय मिळवला आहे. शिरोळ वा. येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गुंडेराव जाधव यांच्या पॅनेलचा विजय झाला.
माजी मंत्री, आमदार संभाजी पाटील-निलंगेकर यांचे दत्तक गाव ताडमुगळी येथे भाजपचे सर्व उमेदवार निवडून आले आहेत. माजी पंचायत समिती उपसभापती ज्ञानेश्वर वाकडे यांना आपला गड राखण्यात यश मिळाले आहे. या निवडणुकीत मोठे परिवर्तन झाले असून, नेतेमंडळी, पदाधिकाऱ्यांना डावलून मतदारांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील ४८ पैकी ३७ ग्रामपंचायतींवर भाजपने विजय मिळवल्याचा दावा भाजपचे अरविंद पाटील-निलंगेकर यांनी केला आहे. तर मतदार संघातील ७० ते ८० टक्के ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा फडकल्याचे काँग्रेसचे अभय सोळुंके म्हणाले. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील-निलंगेकर यांनी २८ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा फडकल्याचे सांगितले.