किल्लारी पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या नणंद गावातील एका अल्पवयीन मुलीच्या मागे काही वर्षांपासून प्रेमाचा तगादा लावून, लग्न करण्यासाठी पळून जाऊ म्हणून दोन वर्षांपासून तिचा पाठलाग करून त्रास दिला जात होता तसेच कुटुंबातील आई, वडिलांनाही त्रास दिला जात हाेता. या त्रासास कंटाळून सदरील मुलीने आत्महत्या केली होती. याप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात कलम ३०५, ३३४ (ड), आयपीसी ७, ८ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कदम यांनी तपास करून आरोपी किरण खंडू जाधव (रा. नणंद, ता. निलंगा) याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. मुलीचा मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळाचा पंचनामा, साक्षीदारांनी दिलेल्या योग्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीस ७ वर्षे सश्रम कारावाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता मंगेश महिंद्रकर यांनी काम पाहिले. ट्रायल मॉनिटरिंग सेलचे पोलीस उपनिरीक्षक आवेज काजी, पोना. इम्रान शेख, पोहेकॉ. तुकाराम चव्हाण यांनी साक्षीदारांना मार्गदर्शन केले.
अल्पवयीन मुलीचा छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सात वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:19 IST