चाकूर (जि. लातूर) : तालुक्यातील लिंबाळवाडी येथील सप्ताहाच्या कार्यक्रमातून गावातील ९७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने गांभिर्याने दखल घेतली आहे. शुक्रवारी आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले असून गावातील प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्याची मोहीम सुरु केली आहे. दरम्यान, गावातील एक व्यक्ती अंत्यसंस्कारासाठी बाहेरगावी गेला होता. तो गावात परतल्यानंतर त्याच्या संपर्कातून कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
तालुक्यातील लिंबाळवाडी हे १२०० लोकसंख्येचे गाव आहे. गावात धार्मिक सप्ताह बुधवारपर्यंत पार पडला. त्यात गावातील काही भाविकांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, गावातील एका व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याचे चाचणीनंतर निष्पन्न झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या संपर्कातील ९ व्यक्ती पाॅझिटिव्ह आल्या. त्यामुळे गुरुवार व शुक्रवारी या दोन दिवसांत गावातील २७५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असता त्यात ९७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आल्याने प्रशासनास धक्काच बसला.
त्यामुळे तहसीलदार डाॅ. शिवानंद बिडवे, गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे, पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. अर्चना पंडगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीनिवास हासनाळे, जिल्हा परीषद सदस्य धनश्री अर्जुने, सरपंच शरद बिराजदार, तलाठी अविनाश पवार, ग्रामसेविका अपेक्षा पाटील यांनी लिंबाळवाडी गावात जाऊन शुक्रवारी पाहणी केली तसेच तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. ग्रामस्थांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी. प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन सरपंच शरद बिराजदार यांनी केले आहे.
गावात १० जणांचे पथक...
आरोग्य विभागाच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीनिवास हासनाळे व त्यांचे सहकारी असे एकूण दहा जणांचे एक पथक येथे गावातील सर्व व्यक्तींची कोरोना चाचणी करीत आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी केली जाणार आहे. काहींना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे तर काही रुग्णांना चाकूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात येणार आहे, असे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. अर्चना पंडगे यांनी सांगितले.
गावातील कोणीही बाहेरगावी जणार नाही...
कोरोनाचा संसर्ग पाहता प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीची चाचणी करण्यात येणार आहे. खबरदारी म्हणून गाव दहा दिवसांसाठी सील करण्यात आले आहे. या कालावधीत गावातील कोणीही बाहेरगावी जाणार नाही अथवा गावात येणार नाही. ग्रामस्थांना संसारपयोगी साहित्य ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घरपोच करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
- डाॅ. शिवानंद बिडवे, तहसीलदार.