लातूर : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीचे अनेक अर्ज महाविद्यालयस्तरावर प्रलंबित आहेत. त्यामुळे यंदा शिष्यवृत्ती कधी मिळणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करण्याच्या वारंवार सूचना करूनही महाविद्यालयांचे त्याकडे दुर्लक्ष आहे. परिणामी, ८ हजार ४२४ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव महाविद्यालयाकडेच अडकले आहेत.
ओबीसी, विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गातील ४७४३ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. तर अनुसूचित जातीच्या ३६८१ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. याशिवाय राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्याचे अर्जही महाविद्यालयांकडेच अडकले आहेत. मार्च एण्ड काही दिवसांवर आला असताना अचूक अर्ज प्राचार्यांच्या लाॅगीनवर पोहोचला नसल्याने विद्यार्थी अडचणीत आहेत.
शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टल ३ डिसेंबर २०२० पासून सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज अचूक भरून मंजुरीसाठी महाविद्यालय लाॅगीनवर पाठवावे. महाविद्यालयात शिष्यवृत्तीचे काम पाहणारे कर्मचारी व प्राचार्यांनी या अर्जांची अचूक पडताळणी करून मंजुरीसाठी सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाकडे ३१ मार्चपर्यंत पाठविणे आवश्यक आहे.