दुपारी चारनंतर दुकाने सुरू ठेवण्याबाबत निर्बंध घालण्यात आले आहेत. असे असतानाही लातूर शहरासह जिल्ह्यात सायंकाळी उशिरापर्यंत दुकाने, हाॅटेल्स सुरू ठेवली जात असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, शनिवार, रविवारी पूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याच्या सूचना असतानाही काही दुकाने, हाॅटेल्स बिनधास्तपणे सुरूच राहत असल्याचे समाेर आले आहे.
या दुकानांवर लक्ष काेणाचे...
संचारबंदीच्या काळात दुकाने उघडी ठेवणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत. त्यानुसार स्थानिक पाेलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन कारवाई करते. सायंकाळी शहर पाेलीस ठाण्याचे कर्मचारी शहरातून गस्त घालतात. यापूर्वी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पाेलीस कर्मचारी गस्तीवर आले की, मग दुकाने काही प्रमाणात बंद ठेवली जात आहेत. पाेलीस गेले की पुन्हा ही दुकाने उघडली जात असल्याचे समाेर आले आहे.
किराणा हवा की जेवण...
लातुरात सायंकाळनंतर संचारबंदीचे आदेश लागू आहेत. असे असले तरी रात्री उशिरापर्यंत काही भागात दुकाने, हाॅटेल्स उघडी ठेवली जात असल्याचे समाेर आले आहे. दुकाने, हाॅटेल्स बाहेरून बंद असली तरी, आतून सर्व काही आलबेल असल्याचे चित्र आहे. जवळपास सर्वच दुकाने, हाॅटेल्स रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे पाहणीत समाेर आले आहे.
कारवाई सुरूच...
लातूर शहरात सायंकाळी दुकाने उघडी ठेवणाऱ्या दुकानदारांवर पाेलीस आणि महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने कारवाई केली जात आहे. सध्या शहरात कारवाई सुरू आहे.
- निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक