रेणापूर : तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवकांनी पुढाकार घेऊन ४५ वर्षांपुढील ग्रासम्थांना नजीकच्या आरोग्य केंद्रात, उपकेंद्रात काेविड लसीकरण करुन घेण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण रेणापूर तालुक्यात व्हावे, असे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मोहन अभंगे यांनी केले आहे.
जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तो रोखण्यासाठी शासन व प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. सध्या ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोरोना चाचणी व कोविड लसीकरण मोहीमही राबवली जात आहे. तालुक्यातील नागरिकांनी चाचणी व लस घेण्यात सहभाग नोंदवला आहे. मात्र, लसीकरणाचा वेग आणखी वाढविण्यासाठी तालुका प्रशासन, आरोग्य विभाग व पंचायत समिती प्रशासनासह सरपंच व ग्रामसेवकांनी पुढाकार घ्यावा. ४५ वर्षांपुढील प्रत्येकाने लसीकरण करून घ्यावे तसेच बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींनी तत्काळ कोविड चाचणी करुन घ्यावी, असे आवाहनही गटविकास अधिकारी मोहन अभंगे यांनी केले आहे.
आपली जबाबदारी...
कोविड लसीकरणासाठी तालुक्यातील सरपंच, पंचायत समिती सदस्य व ग्रामसेवकांनी पुढाकार घेऊन आपापल्या ग्रामपंचायतीमधील ४५ वर्षांपुढील नागरिकांना आरोग्य केंद्र, उपकेंद्रावर प्रवृत्त करावे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून स्वतःहून लसीकरण करून घ्यावे. आपल्या गावाचे शंभर टक्के लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मोहन अभंगे यांनी केले आहे. दरम्यान, त्यांनी कोळगाव व वांगदरी येेथे चांगली लसीकरण मोहीम राबविल्याचे सांगितले.