गातेगाव येथे समाधान शिबिर उपक्रमाचा नुकताच प्रारंभ झाला. शिबिराचे उद्घाटन लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक नाथसिंह देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी लातूर ग्रामीण संगांयो समितीचे अध्यक्ष प्रविण हणमंतराव पाटील यांनी उपस्थित निराधारांना योजनेबद्दल माहिती दिली. शिबिरात संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजनेच्या अर्जासाठी आवश्यक शपथपत्र, उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रे जागेवर उपलब्ध करून संबंधीत अर्ज दाखल करणे आदी प्रक्रिया या समाधान शिबिरात करण्यात आली. यासाठी संगांयो समितीचे सदस्य परमेश्वर पवार व अमोल देडे, राजकुमार सुरवसे, मंडल अधिकारी त्र्यंबक चव्हाण, तलाठी स्मिता आळंगे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विरसेन भोसले, किशोर माळी, सरपंच नागनाथ बनसोडे, उपसरपंच ज्ञानेश्वर जुगल, ग्रामपंचायत सदस्य शंकर देशमुख, शिवरूद्र चौंडे, लाला सरवदे, तानाजी पाटील, जगन्नाथ मोरे, राम माळी आदींनी सहकार्य केले.
गावपातळीवर अर्ज प्रक्रिया
लातूर तालुक्यातील निराधारांना 'संगांयो - इंगांयो' योजनेचा लाभ व्हावा, योजनेपासून कोणी वंचित राहू नये, यासाठी समितीच्या वतीने गावपातळीवर अर्ज प्रक्रियेचे सुलभीकरण करण्यात येत आहे. यासाठी महसूल प्रशासनाच्या सहकार्याने गावोगावी समाधान शिबिरे घेण्यात येणार आहेत. शिबिरात निराधारांना योजनांची माहिती देऊन त्यांची अर्ज दाखल प्रक्रिया गावातच करण्यात येत असल्याची माहिती लातूर तालुका ग्रामीणच्या संगांयो समितीचे चेअरमन प्रवीण हणमंतराव पाटील यांनी दिली.