जळकोट तालुका हा डोंगरी म्हणून ओळखला जातो. तालुक्यात सिंचनाचे प्रमाण वाढावे. त्यातून शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न घेता यावे आणि त्यांची आर्थिक प्रगती व्हावी म्हणून शासनाच्या वतीने मग्रारोहयोअंतर्गत सिंचन विहीर खोदली जाते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय होऊन तालुका टँकरमुक्त होण्यास मदत होते. विशेष म्हणजे, ही सिंचन विहीर मजुरांवर खोदण्यात येत असल्याने मजुरांच्या हाताला कामही मिळते.
तालुक्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने जमिनीतील पाणीपातळी वाढली आहे. त्याचा फायदा होणार आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या संबंधित विभागाने ४७ गावांपैकी ३९ गावांत सार्वजनिक सिंचन विहिरींना मंजुरी दिल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यातून मजुरांच्या हाताला काम मिळणार आहे, असे गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांनी सांगितले. येलदरा, चेरा, अतनूर येथील विहिरींचे काम पूर्ण झाले आहे, असेही ते म्हणाले.
पाणीटंचाई होणार दूर
सार्वजनिक सिंचन विहिरींमुळे तालुक्यातील गावांतील पाण्याचा प्रश्न संपुष्टात येण्यास मदत होणार आहे. एका विहिरीसाठी सात लाखांचा खर्च आहे. या विहिरींचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी पंचायत समिती प्रयत्नशील आहे. तसेच उन्हाळ्याच्या कालावधीत मजुरांच्या हाताला काम उपलब्ध होणार आहे.