लातूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ८ हजारांच्या पुढे आहे. चाचण्या वाढविल्यामुळे रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊनला मोठा प्रतिसाद दिला. लातूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईत शुकशुकाट होता. रस्त्यावर केवळ पोलीस दिसत होते. शिवाजी चौक, गंजगोलाई, गांधी चौक, गूळ मार्केट, औसा रोड, बार्शी रोड, अंबाजोगाई रोडवर नेहमी वर्दळ असते. मात्र, शनिवारी लॉकडाऊन असल्याने चिटपाखरूही रस्त्यावर नव्हते. सगळे शहर सामसूम होते. लातूर शहराप्रमाणे ग्रामीण भागात, तालुक्याच्या ठिकाणीही कडकडीत बंद पाहायला मिळाला. जिल्हा प्रशासन व पोलिसांच्या वतीने लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा सतर्क होती. पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना पोलिसांना अडवून प्रतिबंधात्मक कारवाई केली. गांधी चौक, शिवाजीनगर, एमआयडीसी पोलीस ठाण्यात या नागरिकांना बसवून प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत १७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता अन्य दुकाने कडेकोट बंद असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता.
एसटीचे १८ लाखांचे उत्पन्न बुडाले...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर जिल्ह्यातील लातूर, अहमदपूर, उदगीर, औसा, निलंगा या पाचही आगारांच्या लांब पल्ल्याच्या गाड्या बंद होत्या. या पाचही आगारांच्या ३०० बस प्रवाशाच्या दिमतीला असायच्या; परंतु प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने लांब पल्ल्याच्या सर्वच गाड्या बंद होत्या. ६०० फेऱ्यांपैकी जिल्हाअंतर्गत प्रती आगार ८ ते १० फेऱ्या झाल्या. त्यामुळे एस.टी.चे १८ लाखांचे नुकसान पहिल्या दिवशी शनिवारी झाले.
लॉकडाऊनपूर्वी एस.टी.ला. जिल्ह्यातील पाचही आगारांना मिळून दिवसाला ३५ लाखांचे उत्पन्न मिळत होते. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर १८ लाखांवर उत्पन्न आले होते. मात्र, त्यातही कडक निर्बंध सुरू झाल्याने घट झाली होती. शनिवारी त्यात पुन्हा आणखी घट झाली असून, प्रवासी नसल्यामुळे एस.टी.ला. १८ लाखांचा तोटा शनिवारी सहन करावा लागला.
मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई
गांधी चौक, शिवाजीनगर, एमआयडीसी, ग्रामीण आणि विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना अडवून पोलीस ठाण्यामध्ये आणले. नागरिकांना पोलीस ठाण्यामध्ये काही काळ बसवून त्यांच्याकडून दंड वसूल केला. जवळपास १७ हजार रुपयांचा दंड आकारून सोडून देण्यात आले.