लातूर : कोरोनाकाळात अनेकांनी लुटमार सुरू केली आहे. त्यात खाजगी ट्रॅव्हल्सही मागे नाहीत. तिकिटाचे दर तिप्पट, चौपट घेतले जात आहेत. यात प्रवासी अन् ट्रॅव्हल्स चालकही तेरी भी चूप, मेरी भी चूप म्हणत जात होते. याची कुणकुण लातूरच्या प्रादेशिक परिवहन विभागाला लागली; पण तीन दिवस दररोज प्रवाशांशी चर्चा करूनही कोणी सांगेना. बुधवारी परिवहन विभागाच्या पथकातील तिघांनी ऑनलाइन बुकिंग करून रात्री पुण्यासाठी गाडीत बसले अन् तपासणीच्या वेळी भंडाफोड झाला. परिवहनच्या पथकाने स्टिंग ऑपरेशन केल्याने प्रवाशांची लूट करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पुणे, मुंबई, नागपूरसाठी जाणाऱ्या प्रवाशांकडून खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी तिकिटाचे दर दुप्पट ते चारपट केले होते. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार आल्यावर त्यांनी आरटीओंना सूचना केली. मात्र, दोन दिवस गाडीत प्रवाशांशी चर्चा केल्यावरही कोणीच अधिकचे पैसे दिल्याचे सांगायला तयार होईना. त्यामुळे नेमकी कारवाई कशी करावी, या पेचात अधिकारीही होते. प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील यांनी पथक नियुक्त करून स्टिंग करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद नलावडे, सहायक मोटार वाहन निरीक्षक राेहित कारवार, रोहित मामडे यांनी पुण्यासाठी ऑनलाइन बुकिंग ते ही २१०० रुपयांप्रमाणे केले अन् तिघेही रात्री पुण्याला जाणाऱ्या वरुण ट्रॅव्हल्समध्ये जाऊन बसले. अधिकारी तपासणीला आल्याचे पाहून ट्रॅव्हल्स चालकाने पुण्यासाठी आम्हाला ५५० रुपये तिकीट घेतल्याचे सांगण्याच्या सूचना केल्या. याचवेळी गाडीत बसलेल्या परिवहन विभागाच्या पथकातील सदस्यांनी उठून जाब विचारताच चालकाची बोेलतीच बंद झाली. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशितोष बारकूल यांनी कागदपत्रांची तपासणी केली असता सदरील ट्रॅव्हल्सचा कर थकीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे सदरील वाहन ताब्यात घेण्यात आले असून परवाना रद्दसाठी शिफारस करण्यात आल्याचे स्टिंग ऑपरेशनच्या पथकातील नलावडे यांनी सांगितले.
प्रवाशांनी तक्रार दिल्यास कारवाई...
खाजगी ट्रॅव्हल्सनी तिकिटाची किती आकारणी करावी, याबाबत मर्यादा घालून देण्यात आलेली आहे. तरीही अनेक जण मनमानी तिकीट घेत होते. आम्ही तपासणी केली तरी कोणी सांगायलाही तयार होईना. त्यामुळे कारवाई करावी कशी, असा प्रश्न होता. बुधवारी आमच्या पथकाने सर्व भंडाफोड केला. प्रवाशांनी परिवहन विभागाकडे तक्रार केल्यास आम्ही लूट करणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कारवाई करू, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील यांनी सांगितले.