शहरात सकाळपासूनच संचारबंदीसारखे वातावरण होते. भाजीपाला बाजार पूर्णत: बंद होता. शहरातील मुख्य रस्त्यांवरील सर्व आस्थापना बंद होत्या. किराणा दुकान, भाजीपाला, दूध व्यावसायिक, हॉटेल चालकांनी होम डिलिव्हरी बंद ठेवली होती. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, आझाद चौक, महात्मा बसवेश्वर चौक, स्वा. सावरकर चौक, हनुमान चौक व अन्य चौकांत कुठलीही वाहतूक नव्हती. नांदेड - लातूर या मुख्य रस्त्यावर तुरळक प्रमाणात बसने वाहतूक सुरू होती. सकाळी लातूर आणि उदगीरला शटल बस सुरू होत्या. मात्र, प्रवासी नसल्याने त्याही बंद करण्यात आल्या.
अहमदपूर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, रामचंद्र केदार, पोलीस निरीक्षक विजय पाटील, नागोराव जाधव, एकनाथ डंख यांनी चौकात चोख बंदोबस्त ठेवला होता.
पोलीस वाहन नसल्यामुळे गस्त बंद...
वीकेंड लाॅकडाऊनला नागरिकांनी प्रतिसाद दिला. दरम्यान, पोलीस ठाण्याची दोन्ही वाहने दुरुस्तीसाठी लातूरला गेल्यामुळे पोलीस पेट्रोलिंग बंद होती. चौकांत पोलीस होते. दरम्यान, लातूरहून मोठी पोलीस व्हॅन आली.
रुग्णांच्या नातेवाइकांचे हाल...
अहमदपूर शहर संपूर्णत: बंद असल्यामुळे ग्रामीण रुग्णालय व खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना अडचणीला सामोरे जावे लागले. त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच भोजन व्यवस्थेत अडचणी येत होत्या.