चाकूर तालुक्यातील जानवळ हे जवळपास १० हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावातील मुस्लिम बांधवांच्या दफनभूमीसाठी रस्ता नसल्याने दफनविधीसाठी मोठी समस्या निर्माण होत असे. पावसाळ्यात तर विविध अडचणी निर्माण होत असत. त्यामुळे येथील मुस्लिम बांधवांकडून रस्त्याचा प्रश्न सोडविण्याची सतत मागणी होत होती. त्यामुळे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी गुरुवारी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी केली. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून हा रस्ता जाणार आहे, त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केली.
यावेळी शेतकरी श्रीधर साखरे, वैजनाथ साखरे, ज्ञानोबा पवार, पांडुरंग साखरे आदी उपस्थित होते. त्यांनी रस्त्यासाठी ६ फूट रुंद व १८० मीटर लांब जागा देण्यास सहमती दर्शविली.
शुक्रवारी तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, मंडळाधिकारी नीळकंठ केंद्रे, तलाठी भाऊसाहेब पाटील, भूमी अभिलेखचे कर्मचारी अविनाश गायकवाड, गुरुमे, वाय.एम. कर्डिले, बीट जमादार थोरमोटे, उपसरपंच ज्ञानेश्वर पवार, राष्ट्रवादी किसान सेलचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय पवार, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष मधुकर कर्डिले, आत्माराम गव्हाणे, सत्तार शेख, अयुब पठाण, बशीरसाहेब करपुडे आदींच्या उपस्थितीत रस्त्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांनी सहकार्य करावे...
जानवळ येथील दफनभूमीच्या रस्त्याचा प्रश्न ५० वर्षांपासून प्रलंबित होता. संबंधित शेतकरी व मुस्लिम बांधवांच्या सहकार्यातून तो निकाली काढण्यात आला आहे. जानवळ व परिसरातील शेत रस्त्याचे प्रश्न शेतकऱ्यांच्या सहकार्यातून निकाली काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी केले.