उदगीर : साडेतीन महिन्यांपूर्वी बाळंतपणासाठी उदगीर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या एका महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली होती. तेव्हा या महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला होता. दरम्यान, काही दिवसांनी ऑनलाईन नाेंदणी करताना तांत्रिक चुकीमुळे अहवाल पॉझिटिव्ह असल्याची नोंद झाली आणि त्याचा त्रास शुक्रवारी अतनूर येथील एका कुटुंबाला सहन करावा लागला.
जळकोट तालुक्यातील अतनूर येथील किशन मुगदळे यांची सून २३ नोव्हेंबर रोजी बाळंतपणासाठी उदगीरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली होती. त्यावेळी कोरोना चाचणी करण्यात आली असता, तिचा अहवाल निगेटिव्ह आला होता. बाळंतपणानंतर मुगदळे यांची सून देगलूर तालुक्यातील माहेरी गेली आणि त्यानंतर ३ मार्च रोजी सासरी आली. दरम्यानच्या काळात तिची कुठलीही तपासणी झाली नाही. दरम्यान, काही दिवसांनी ऑनलाईन नोंदणी करताना डाटा एन्ट्री ऑपरेटरच्या तांत्रिक चुकीमुळे या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह नोंदला गेला. त्यामुळे शुक्रवारी अतनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक मुगदळे यांच्या घरी पोहोचले. बाळंत महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती उदगीर ग्रामीण रुग्णालय आणि तालुका आरोग्य कार्यालयाकडून मिळाली असल्याचे सांगितले. तेव्हा मुगदळे यांना धक्काच बसला. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली आणि अहवाल निगेटिव्ह आला.
नजरचुकीने नोंदणी...
ऑनलाईन नोंदणी करताना नजरचुकीने पॉझिटिव्ह नोंद झाली. शुक्रवारी या महिलेची पुन्हा चाचणी करण्यात आली, त्यावेळी अहवाल निगेटिव्ह आल्याचे अतनूर आराेग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हरेश्वर सुळे यांनी सांगितले.