राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तहसील, आरोग्य, पोलीस आणि नगरपंचायत प्रशासन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे. मात्र, कोरोनासंदर्भात शासनाने लागू केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन होत नसल्याने प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.
जर प्रत्येक खासगी दवाखान्यात स्वतंत्र कोरोना कक्ष सुरू करून रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिली, तर रुग्णांना आपल्या खासगी फॅमिली डॉक्टरकडून स्थानिक पातळीवर उपचार करून घेता येतील. त्यामुळे रुग्णांच्या मनातील भीती दूर होऊन उपचार होतील. सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची दमछाक होत आहे. त्यासाठी शासनाने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी माजी आ. सुधाकर भालेराव व तालुक्यातील नागरिकांतून होत आहे.