कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना केंद्र सरकारने खत, बियाणांच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे संकट निर्माण झाले आहे. अगोदरच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला खर्चाऐवढा भाव मिळत नाही. परिणामी, शेतकरी शेतीसाठी बँक, सोसायटीकडून काढलेल्या पीककर्जाची आर्थिक परिस्थितीमुळे परतफेड करू शकत नाही. त्यातच केंद्रे शासनाने खत, बी-बियाणांत दर वाढ केली आहे.
केंद्रीय खत, रसायन मंत्र्यांनी बैठकीत खत व बी- बियाणांच्या किमतीत दरवाढ होणार नाही, असा निर्णय घेतला होता. तरीसुद्धा दर वाढ झाली. ही दरवाढ तत्काळ रद्द करून जुन्या किमतीमध्ये खत, बियाणे विक्री करण्यात यावे. तसेच बियाणे, खतात फसवणूक व लुबाडणूक केलेल्या कंपनांच्या बियाणे विक्रीस बंदी घालावी. दुकानदारांकडे आलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या खत व बियाणांची योग्यता कृषी खात्यामार्फत तपासली जावी. चांगले खते व बियाणे विक्रीस परवानगी देण्यात यावी. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार नाही. प्रत्येक खत दुकानांसमोर केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या किमतीचे दर फलक लावण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या.
निवेदनावर काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील-निलंगेकर, दयानंद चोपणे, सुरेंद्र धुमाळ, लाला पटेल, अशोकआप्पा शेटकार, सिराज देशमुख, देविदास जाधव, अमित नितनवरे, सोनाजी कदम, भरत बियाणी, रमेश मोगरगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.