लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदपूर : संचारबंदीमुळे अनेकांचे व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे रेशनकार्डधारकांना मे महिन्यात मोफत रेशन वाटपाचा निर्णय शासनाच्यावतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे अहमदपूर तालुक्यातील ३२ हजार २३५ शिधापत्रिकाधारकांना मोफत रेशनचे वाटप होणार आहे. संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर धान्य वाटप होणार असल्याने अनेक गरजूंना आधार मिळणार आहे.
संचारबंदीमुळे हातावर पोट असणाऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे आर्थिक संकटाची भीती निर्माण झाली आहे. अगोदरच कामधंदे बंद झाल्यामुळे मजुरांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. पुन्हा लॉकडाऊन वाढवल्यामुळे मजुरांच्या संकटामध्ये भर पडली आहे. मजुरांसाठी शासनाने मदतीच्या हात दिला असून, गोरगरीब, हातावर पोट असलेल्यांसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत मोफत गहू, तांदूळ उपलब्ध करुन दिले आहेत. अहमदपूर तालुक्यात अंत्योदय योजनेंतर्गत ४ हजार ९९ कार्डधारक लाभार्थी आहेत. तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी अंतर्गत २८ हजार १३६ कार्डधारक लाभार्थी आहेत. एकूण ३२ हजार २३५ शिधापत्रिकाधारक कुटुंब आहेत. या शिधापत्रिकाधारकांना शहरातील १५ तर ग्रामीण भागातील १५० अशा १६५ रेशन दुकानांतून धान्याचे वितरण केले जात आहे. शासनाच्यावतीने मेमध्ये अंत्योदयसाठी १,५८१ क्विंटल गहू, ९१७ क्विंटल तांदूळ, प्राधान्य कुटुंबासाठी ९,०६० क्विंटल गहू, ६,०४० क्विंटल तांदळाचे मोफत वाटप होणार आहे. तर शेतकरी गटातील ६ हजार ७९२ शिधापत्रिकाधारकांना दरमहाप्रमाणे याही महिन्यात पैसे घेऊन धान्याचे वितरण होणार नाही. मे महिन्याचे धान्य वितरण सुरु करण्यात आले आहे. मेमध्ये नियमित धान्याबरोबर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील अंत्योदय, अन्नसुरक्षा लाभार्थी प्रत्येक व्यक्तीला ३ किलो गहू, २ किलो तांदूळ मोफत वाटण्यात येणार आहे. शासनाच्या योजनेमुळे गोरगरीब कुटुंबांना आधार मिळाला आहे.
पुरवठा विभागाच्या सूचनेनुसार वाटप...
३२ हजार २३५ कुटुंबांना राज्य शासनाच्या मे २०२१चे नियमित असलेले धान्य अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना मोफत वाटप करण्याबाबतच्या सूचना आहेत. त्याप्रमाणे जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुने व तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली रास्त भाव दुकानदारांमार्फत वाटप करण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनामार्फत वरील लाभार्थींना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना मे २०२१ व जून २०२१ या दोन महिन्यांसाठी नियमित धान्यासोबत अतिरिक्त धान्याचे मोफत वाटप करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. गहू ३ किलो, तांदूळ २ किलो याप्रमाणे वितरीत करण्यात येत आहे. हे धान्य वाटपासाठी बी. जी. मिट्टेवाड व गोदामपाल राजकुमार भगत (अहमदपूर) हे परिश्रम घेत आहेत.
- डी. के. मोरे, नायब तहसीलदार, पुरवठा विभाग, अहमदपूर