कोरोना काळात पावणेदोन कोटींची कमाई
लातूर विभागात एकूण २२ मालवाहतूक बसेस आहेत. लातूर आगाराकडे १६ असून या १६ बसेसनी ४ लाख ३८ हजार ६२८ कि.मी.चा प्रवास करून १ कोटी ८३ लाख ८४ हजार ५३९ रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. सदर उत्पन्न एप्रिल महिना अखेरचे आहे.
प्रवासी वाहतुकीला मालवाहतुकीचा पर्याय महामंडळाने स्वीकारल्याने एसटी मालामाल होत आहे. मात्र चालकांची तारांबळ आहे.
परतीचा मालवाहतूक मिळेपर्यंत मुक्काम
एसटीच्या ट्रकमध्ये मालवाहतूक घेऊन गेल्यानंतर जिथे मालाची डिलिव्हरी केली जाते तेथून परत येताना भाडे मिळाले पाहिजे. जोपर्यंत भाडे मिळत नाही, तोपर्यंत चालकांचा मुक्काम तिथेच राहतो. दरम्यानच्या काळात चालकाचा विकली ऑफ आला तर तो तेथेच ग्राह्य धरला जातो. परत डेपोत आल्यानंतर सदर विकलीऑफ चालकाला मिळत नाही.
ॲडव्हान्स मिळतो, पण पगारातून होतो कट
एक हजार रुपये ॲडव्हान्स देण्याची सोय आहे. तो चालकाला दिलाही जातो. लांब पल्ल्याच्या ठिकाणी गेल्यानंतर तेथे अनेक मुक्काम वाढतात. मुक्काम वाढल्यानंतर एक हजार रुपये पुरत नाहीत. संबंधित मुक्कामाच्या ठिकाणची विश्रांतीची, भोजनाची सोय नसते. त्यामुळे खर्च होतो. ॲडव्हॉन्स पुरत नाही. इकडे परत आल्यानंतर दिलेला ॲडव्हान्स पगारातून कट केला जातो.
चालक म्हणतात,
प्रवासी वाहतुकीत २४ तासात परत डेपो गाठणे बंधनकारक असते. माल वाहतुकीत मात्र आठ ते पंधरा दिवस बाहेर मुक्काम होऊ शकतो. कुटुंबापासून दूर राहावे लागते. पैसाही मिळत नाही. उलट ॲडव्हान्स रक्कम पगारातून कट केली जाते. - शिवानंद व्हत्ते, चालक
दोन-अडीचशे कि.मी.च्या प्रवासासाठी फक्त चालक असतो. याच दरम्यान गाडी पंक्चर झाली तर अडचण होते. त्यासाठी चालकासोबत हेल्पर असायला हवा. शिवाय, आठवडी सुटी आणि भत्ता वाढवून भोजन, विश्रांतीची सोय महामंडळाने करणे आवश्यक. - पांडुरंग अंकुश, चालक
चालकांच्या भोजनाची, राहण्याची सोय एसटीने करणे आवश्यक आहे. आठ-आठ दिवस बाहेर चालकांना राहावे लागत असल्याने त्यांची गैरसोय होत आहे. दिलेला ॲडव्हान्सही पगारातून कपात केला जातो. भोजन मिळत नसल्यामुळे हाल होतात. या सर्व बाबींचा विचार करून भत्त्यामध्ये वाढ करावी.
- पांडुरंग वाघमारे, अध्यक्ष, बहुजन राज्य परिवहन कर्मचारी संघटना