लातूर : समाजापासून दुरावलेले आणि अधांतरी जीवन जगणाऱ्या जन्मत: एचआयव्ही संक्रमित असलेल्या युवकांना त्यांचा स्वत:चा विवाह स्वप्नवतच वाटतो. परंतु, हासेगावच्या हॅप्पी इंडियन व्हिलेजमध्ये तो प्रत्यक्षात होत असून, चार वधू-वरांच्या हातावर मेहंदी रंगली आहे. शनिवारी सायंकाळी हळदीचा कार्यक्रमही उत्साहात पार पडला. व्हॅलेंटाईन डे दिवशी त्यांच्या रेशीमगाठी बांधल्या जाणार असून, जीवनात नवा आनंद बहरू लागला आहे.
सन २००७ मध्ये प्रा. रवी बापटले यांनी हासेगाव येथे समाजातील दानशुरांच्या मदतीने एचआयव्ही संक्रमित बालकांसाठी सेवालय सुरू केले. त्यानंतर एचआयव्ही संक्रमित १८ वर्षांपुढील युवकांसाठी २०१५ मध्ये हॅप्पी इंडियन व्हिलेज निर्माण केले. त्यासाठी सेवालयातील मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व गणेशमूर्ती विक्रीतून निधी उभारला. १४ एकरवरील या प्रकल्प परिसरात दोन हजार फुला-फळांची झाडे आहेत. सेवालयात ५० मुले तर हॅप्पी इंडियन व्हिलेजमध्ये ३५ युवक आहेत.
उपवर झालेल्या चौघा वधू-वरांचा सामूहिक विवाह सोहळा रविवारी होत आहे. त्यामुळे हॅप्पी इंडियन व्हिलेजवर विवाह सोहळ्याची धामधूम सुरू आहे. स्वच्छता, सुशोभिकरण करण्यात आले आहे. दुपारी विवाहानंतर वाजविण्यात येणाऱ्या वाद्यांचा युवकांनी सरावही केला. विवाह म्हटलं की, हातावर मेहंदी, हळद असतेच. त्याप्रमाणे येथील वधू-वरांच्या हातावर मेहंदी काढण्यात आली असून, सायंकाळी हळदीचा कार्यक्रमही रंगला. प्रकल्पावरील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे.
सत्यशोधकी पद्धतीने विवाह...
पूजा-महेश, सोनी-अक्षय, अश्विनी-राजबा, नेहा-राजकुमार यांच्या जीवनाच्या रेशीमगाठी रविवारी सायं. ६ वा. हॅप्पी इंडियन व्हिलेजवर बांधल्या जाणार आहेत. त्यांचे पालकत्व डॉ. संध्या वारद, डॉ. संजय वारद, आ. अभिमन्यू पवार, डॉ. पवन चांडक, कृष्णा महाडिक, डॉ. प्रीती कणिरे, डॉ. स्वप्निल कणिरे, राचोटी स्वामी, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम, ज्येष्ठ पत्रकार जयश्रीताई खाडिलकर यांची स्वीकारले आहे. हा विवाह सोहळा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सत्यशोधकी पद्धतीने होणार आहे.
सहा वर्षांत १४ विवाह...
सहा वर्षात हॅप्पी इंडियन व्हिलेजमधील १४ वधू-वरांचा विवाह झाला आहे. सन २०१४ आणि २०१५ मध्ये प्रत्येकी एक, २०१६ मध्ये तीन, २०१७ मध्ये दोन, २०१८ मध्ये तीन असे विवाह झाले आहेत. विवाह झालेले सर्वजण एकमेकांशी आनंदाने राहात आहेत, असे सेवालयाचे प्रमुख प्रा. रवी बापटले यांनी सांगितले.