लातूर : अनलॉक आणि राखी पौर्णिमेमुळे एस. टी. बसच्या प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे लातूर आगारातून उदगीर, परभणी, वसमत, कळंब, हैदराबाद आदी ठिकाणी फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील मागणीनुसार बस सोडण्याचे नियोजन आगारप्रमुखांनी केले आहे.
लातूर आगारात सध्या ९३ बसेस आहेत. या बसेसच्या १८९ फेऱ्या सुरू आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उदगीरसाठी ४८ फेऱ्या होत्या, त्या आता ७२ करण्यात आल्या आहेत. परभणीसाठी २० फेऱ्या होत्या, त्या आता ३० करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरसाठी चार फेऱ्या होत्या, त्या आता पाच करण्यात आल्या आहेत. कळंबसाठी आठ फेऱ्या होत्या, त्या वाढवून वीस करण्यात आल्या आहेत. सणासुदीचे दिवस असल्यामुळे प्रवासी वाढत असून, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवासी वाढविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी आवश्यकतेनुसार गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे.
प्रवाशांची गर्दी...
उदगीर, कळंब, निलंगा, अहमदपूर, परभणी, वसमत, हैदराबाद आदी मार्गांवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. प्रवासी संख्या वाढल्यामुळे लातूर आगाराने वसमतसाठी सकाळ-संध्याकाळ दोनवेळा गाडी सोडली आहे.
या मार्गांवर वाढल्या फेऱ्या...
उदगीर, परभणी, कोल्हापूर, कळंब, वसमत, निलंगा, औसा तसेच ग्रामीण भागात फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. शंभर फेऱ्या होत्या, त्यात ८९ फेऱ्यांची वाढ झाली आहे. शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यानंतर यात आणखीन वाढ होईल, असे आगार प्रमुखांनी सांगितले.
आगारप्रमुखांचा कोट...
लातूर आगाराच्या ९३ बसेस सध्या धावत आहेत. त्यांच्या १८९ फेऱ्या होत आहेत. यामुळे उत्पन्नातही वाढ होत आहे. सध्या बसस्थानकात चार गाड्या ठेवल्या आहेत. आवश्यकतेनुसार या बसेसच्या फेऱ्या वाढवल्या जातील.
- जाफर कुरेशी, आगार व्यवस्थापक, लातूर