लातूर : अन्न व औषधी प्रशासनाने गेल्या वर्षभरात अवैध गुटखा, सुगंधी जर्दा विक्रीविरोधात मोहीम राबविली असून, या मोहिमेत जिल्ह्यात ४१ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. या धाडीत १ कोटी २९ लाख ८८ हजार ५३१ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेला गुटखा ठेवण्यासाठी एफडीएकडे पुरेशी जागा नसल्याने संबंधित पोलीस ठाण्यात गुटखा ठेवावा लागतो.
राज्य शासनाने गुटखा विक्रीला बंदी घातली आहे. तरीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोरून गुटख्याची विक्री होते. याविरोधात अन्न व औषधी प्रशासनाच्या वतीने धाडी टाकण्यात आल्या. जानेवारी ते डिसेंबर या १२ महिन्यांत ४१ धाडी टाकून १ कोटी २९ लाख ८८ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. एकूण पाच रेडमधील ५५ लाख १५ हजार ७० रुपयांचा गुटखा नष्ट करण्यात आला आहे. उर्वरित गुटख्याचे सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अहवालानंतर विल्हेवाट लावली जाते.
पानपट्टी, किराणा दुकान, तसेच छोट्या हाॅटेल्समध्ये सर्रास गुटखा व सुगंधी जर्द्याची विक्री होते. यावर पाळत ठेवून अन्न व औषधी प्रशासन, तसेच पोलिसांच्या संयुक्त पथकाने वर्षभरात ४१ धाडी टाकून गुटखा जप्त केला. विशेषत: लाॅकडाऊन काळात चोरटी विक्री झाली.
राज्य शासनाने गुटखा व सुगंधी जर्द्यावर बंदी घातली आहे. मात्र, व्यावसायिकाची तमा न बाळगता बिनधास्तपणे विक्री करतात.
लातूर जिल्ह्यानजीक कर्नाटक राज्य आहे. सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात गुटखा आणला जातो. यामध्ये मोठे डीलरही आहेत.