लातूर : घरात विक्रीच्या उद्देशाने ठेवलेल्या ८१ हजारांच्या एमडी (मेफेड्राेन) ड्रग्जप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी लातुरात तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात चाैघांविराेधात गुन्हा दाखल आहे.
खबऱ्याने दिलेल्या माहितीची पडताळणी केल्यानंतर पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी कारवाईचे आदेश दिले हाेते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुतमील परिसरातील एका महिलेच्या घरावर छापा मारला. यावेळी ऋषिकेश शेषराव राठोड (वय २८, रा. नाथनगर, पवन कॉलनी, लातूर), संयम बालाजी पडिले (वय २६, रा. बिदर रोड, उदगीर, जि. लातूर), एक ३५ वर्षीय महिला (रा. सुतमील परिसर, लातूर) या तिन्ही आराेपींना ताब्यात घेतले. तर चाैथा आराेपी अनुप नवनाथ सोनवणे (रा. निगडी, पुणे, हा. मु. सुतमील रोड, लातूर) पसार झाला.
पाेलिस निरीक्षक संजीवन मिरकले म्हणाले, अनुप नवनाथ सोनवणे याच्या पत्नीने स्वतःच्या घरात विक्रीच्या उद्देशाने ठेवलेल्या एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जच्या दोन पिशव्यातील १६.३६ ग्रॅम वजनाचे ८१ हजार ८०० रुपयांचे अमली पदार्थ आढळून आले. तसेच गुन्ह्यात वापरलेले चार मोबाइल, एमडी ड्रग्ज वजन करण्यासाठी वापरलेला वजनकाटा, असा एकूण २ लाख ८२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमालही जप्त केला. तिघांना अटक केली असून, चाैथ्या आराेपीचा शाेध सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि. संजीवन मिरकले, पोउपनि. राजाभाऊ घाडगे, युवराज गिरी, अर्जुन राजपूत, रियाज सौदागर, साहेबराव हाके, मोहन सुरवसे, नाना भोंग, सचिन दरेकर, मनोज खोसे, गोविंद भोसले, राहुल कांबळे, नितीन कठारे, चंद्रकांत डांगे, बंडू निटुरे, प्रदीप चोपणे यांच्या पथकाने केली.