लातूर तालुक्यातील गंगापूर परिसरात यंदा अतिपाऊस झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. या भागातील शेतकऱ्यांनी रबी हंगामात गहू, हरभरा, ज्वारीची पेरणी केली आहे. पिकांसाठी वातावरणही चांगले असल्याने ही पिके बहरत आहेत; परंतु पाण्याची आवश्यकता भासत असताना योग्य दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना विहिरीतील पाणी देता येईना झाले आहे.
गावालगतच्या कॅनल डीपीवरून महावितरणने ३६ शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना विजेचे कनेक्शन दिले आहे. परिणामी, निम्म्या भागातील शेतकऱ्यांच्या विद्युत पंपांना सुरळीत व योग्य प्रमाणात वीज पुरवठा होत नाही. परिणामी, शेतकरी संकटात सापडले असून त्यांनी महावितरणचे उपअभियंता व लातूर ग्रामीणचे सहायक अभियंत्यांना तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
नवीन डीपी बसवावा...
गावानजीकच्या कॅनल डीपीवर ३६ कृषी पंपांना विजेचे कनेक्शन देण्यात आल्याने योग्य प्रमाणात वीज पुरवठा होत नाही. त्यामुळे निम्म्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांना आपल्या विद्युत मोटारी बंद ठेवाव्या लागत आहेत. या भागात दुसरा नवीन डीपी बसविण्यात यावी, अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. महावितरणने ही समस्या दूर करावी, अशी मागणी आहे.