राज्यातील काही भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने मास्कचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर काही सूचना केल्या आहेत. सोमवारी बाजाराचा दिवस असल्यामुळे बहुतांश नागरिक विनामास्क फिरत असल्याच्या तक्रारी प्राप्त होताच उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, साहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, रामचंद्र केदार, पालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांच्या पथकाने संयुक्तपणे कारवाई करण्यास सुरुवात केली.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वा. सावरकर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मुख्य रस्ता तसेच बसस्थानक परिसरात विनामास्क आढळून येणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. यात २५० जणांना २५ हजारांचा दंड ठोठावला. तसेच ज्येष्ठ नागरिक, महिलांना मास्क लावण्याविषयी प्रबोधन केले. या कारवाईची माहिती मिळताच बहुतांश नागरिकांनी मास्क वापरण्यास सुरुवात केली. सदर कारवाईच्या माध्यमातून प्रबोधनही करण्यात आले. मुख्य रस्त्यावर विनामास्क असणारे ग्राहक, दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. तसेच बसस्थानकात असलेले प्रवासी व बसमधील प्रवाशांची पाहणी करण्यात आली. या वेळी आगारप्रमुख शंकर सोनवणे उपस्थित होते.
नागरिकांनी विनामास्क फिरू नये...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विनामास्क फिरू नये. दंड हा पर्याय नाही. त्यामुळे सर्वच नागरिकांनी मास्कचा वापर करावा. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांनी केले.
२५ वाहनांवर कारवाई...
पोलीस अधिनियमाप्रमाणे दोनपेक्षा अधिक व्यक्ती असलेले मोटारसायकलस्वार, रहदारीचे नियम मोडणारे चारचाकी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी वाहतुकीचे नियम हे पाळावे, असे आवाहन प्रभारी साहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी केले.