बेलकुंड : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांपुढे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच महागाईने डोके वर काढल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. खाद्यतेल तेजीत असतानाच डाळींचेही दर कडाडले असल्याने दररोजच्या जेवणातून डाळ गायब झाल्याचे चित्र आहे.
कोरोनाच्या संकटकाळात सुदृढ आरोग्य ठेवण्यासाठी सकस आहाराची आवश्यकता आहे. परंतु आता डाळींच्या दराने शतक पार केल्याने खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. रोजच्या वापरातील सोयाबीन तेलाचा भाव १६० रुपये प्रतिकिलो झाला आहे. या भावात सातत्याने वाढ होत असून यापाठोपाठ डाळींचे दर शंभरावर गेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेल्याने हाताला काम नाही, त्यातच महागाईने भर घातल्याने मजूरवर्ग आता दुहेरी संकटात सापडला आहे. यावर्षी खरीप हंगामातील पिकांना सततचा पाऊस आणि किडींच्या प्रादुर्भावाने चांगलाच दणका दिला होता. याचा परिणाम तूर पिकावरही झाला असून बऱ्याच शेतकऱ्यांची तूर सततच्या पावसाने करपून गेली तर काहींना किडीच्या प्रादुर्भावामुळे फारसे उत्पादन होऊ शकलेले नाही.
महागाईमुळे बजेट कोलमडले...
कडक निर्बंधांमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ होत असल्याने सर्वसामान्य माणूस कोंडीत सापडला आहे. शेंगदाणे ११५, मसूर ८५, मूगदाळ १२०, उडीद १२०, हरभरा ७५ तर तूरदाळ १२५ रुपये किलोवर पोहोचली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.