केंद्राचे पथक लातुरात
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे पथक लातूर जिल्ह्यात दाखल झाले आहे. या पथकाकडून पाहणी होणार आहे. कोविड केअर सेंटर, रुग्णालयाला या पथकाचे सदस्य भेटी देणार आहेत. त्यानंतर कोरोना परिस्थितीचा अहवाल राज्य व केंद्र सरकारला पथक देणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.
लसीचा चार दिवस पुरेल इतका साठा
जिल्ह्यात ४६ हजार ७१० लसींचे डोस उपलब्ध आहेत. ही लस चार ते पाच दिवस पुरू शकते. त्यामुळे नागरिकांनी लस घ्यावी. आतापर्यंत १ लाख २९ हजारांहून अधिक जणांनी लसीकरण करून घेतले आहे. लस उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या हालचाली सुरू आहेत. लसीची कमतरता भासणार नाही, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
रुग्ण वाढले तरी बेडची कमतरता नाही
सध्या जिल्ह्यात सहा हजारांच्या पुढे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील अर्ध्यापेक्षा अधिक गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. त्यामुळे बेड, औषधांची कमतरता नाही. नागरिकांनी घाबरू नये, काळजी घ्यावी आणि नियमांचे पालन करावे.