लातूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली महिला बचतगट आणि बँक अधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय बैठक शुक्रवारी झाली. या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बचत गटांना शंभर कोटींचे कर्ज देण्याच्या बँकांना सूचना केल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल म्हणाले, जिल्ह्यात बचत गटांचे जाळे आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून संघटित झाल्या आहेत. बचत गटांचा वेगवेगळा व्यवसायही आहे. त्यांना अधिक मोठ्या प्रमाणात व्यवसाय करता यावा म्हणून बँकांनी सहकार्य करावे. जिल्ह्यातील सर्व बँकांनी प्रत्येक महिन्यातील ११ व २१ तारीख महिला बचत गटांच्या कामासाठी राखीव ठेवावी. २०२०-२१मध्ये सर्व बँकांनी ५३.५९ कोटी कर्जवाटप केले. त्याबद्दल बँकांचे कौतुक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले. बचत गटांच्या संकल्पना, त्यांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व बँक कर्ज पुरवठा यांचे महत्त्व यावेळी सांगण्यात आले. या बैठकीला विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीला प्रकल्प संचालक संतोष जोशीही उपस्थित होते. यावेळी त्यांनी गटाचे खाते लवकर काढणे गरजेचे असल्याचे सांगितले. अनंत कसबे, जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळेही यावेळी उपस्थित होते. त्यांनी बँकनिहाय प्रलंबित अहवालाचा प्रस्ताव सादर केला.