लातूर : लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत महात्मा फुले भाजीपाला मार्केट नवीन गूळ मार्केट येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला आहे. या मार्केटचे स्थलांतर ही काळाची गरज असली तरी नवीन गूळ मार्केट येथे जनावरांचा बाजार भरतो. त्यामुळे शनिवारी भाजी मार्केटला अडचण येते. त्यामुळे जनावरांच्या बाजारासाठी पर्यायी जागा बघून तेथेच बाजार भरवला जावा, अशी मागणी शेतकरी संघटनेच्यावतीने राजकुमार सस्तापुरे यांनी केली आहे. मार्केट स्थापनेपासून भाजीपाला मार्केट, जुने गूळ मार्केट येथेच आहे. पण ही जागा कमी पडत असल्यामुळे तसेच ट्रॅफिकमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागते. त्यामुळे भाजीपाला मार्केटचे स्थलांतर करणे ही काळाची गरज आहे. परंतु, नवीन गूळ मार्केट येथे दर शनिवारी जनावरांचा बाजार भरवला जातो. या बाजाराला पर्यायी जागा बघून तेथे कायमस्वरूपी बाजार भरवला जावा. भाजीपाला व्यापाऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. एका गटाचे मत मार्केट पहिल्याच ठिकाणी ठेवावे, असे आहे तर दुसऱ्या गटाचे मत नवीन गूळ मार्केट येथे स्थलांतर करावे, असे आहे. त्यामुळे बाजार समितीने या दोन्ही गटांचा विचार न करता शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सस्तापुरे यांनी केली आहे.
जनावरांच्या बाजारासाठी पर्यायी जागा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST