लोकमत न्यूज नेटवर्क
देवणी : येथील राष्ट्रीयीकृत बँकेला काही दिवसांपासून कायमस्वरूपी शाखाधिकारी नसल्याने आणि पुरेशा प्रमाणात कर्मचारी नसल्यामुळे शेतकऱ्यांसह ग्राहकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे कोणत्याही कामासाठी सातत्याने हेलपाटे मारावे लागत आहेत.
देवणी येथे स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बँकेची एकमेव शाखा आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यातील विविध गावांचा आर्थिक व्यवहार तसेच शासकीय कार्यालयांचा आर्थिक व्यवहार या बँकेतून होतो. सामान्य ग्राहक, शेतकरी, व्यापारी, कर्मचाऱ्यांची नियमित आर्थिक उलाढाल होत असते. त्यामुळे या बँकेशी अनेक ग्राहक जोडले गेले आहेत.
सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज आहे. त्यामुळे शेतकरी प्रस्ताव दाखल करत आहेत. परंतु, येथे शाखाधिकारी नसल्याने प्रस्ताव मंजुरीचा प्रश्न निर्माण होत आहे. याशिवाय, येथील व्यवहारांच्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. सध्या शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज मिळत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.
याशिवाय, कर्ज वितरणाला विलंब होऊन शेतकऱ्यांचे कर्जाचे खाते थकबाकीत जाऊन व्याजाचा भुर्दंड भरावा लागत आहे. त्यामुळे येथे नियमित शाखाधिकारी नियुक्त करावा, पुरेसे कर्मचारी द्यावेत, अशा मागण्या तालुक्यातील विविध संघटनांच्यावतीने करण्यात येत आहेत.
प्रशासनाचे दुर्लक्ष...
येथील अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी बँक प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या नवीन पीककर्ज, जुन्या कर्जाचे नूतनीकरणासह अन्य विविध कामांसाठी ग्राहक येत आहेत. परंतु, शाखाधिकारी नसल्याने मोठी समस्या उद्भवत आहे. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या समस्या दूर कराव्यात, अशी मागणी होत आहे.