जूनमध्ये झालेल्या एक- दोन मोठ्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली; परंतु त्यानंतर उघडीप दिल्यामुळे शेतकरी चिंतेत होता. २ जुलै व ८ जुलै रोजी तालुक्यातील सर्व मंडळात पिकांपुरता पाऊस झाला. पुन्हा रविवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. मंगळवारी सायंकाळी सुमारे पाच तास तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढवणा मंडळात सर्वात जास्त तर देवर्जन महसूल मंडळात सर्वात कमी पाऊस झाल्याची नोंद तहसील कार्यालयात झाली आहे. शेतकरी आता फवारणीच्या तयारीला लागले आहेत. या पावसामुळे तालुक्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनसह तूर, उडीद, मूग, ज्वारी या पिकाला फार मोठा फायदा होणार आहे.
तालुक्यात मंगळवारी झालेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे कंसातील संख्या आजपर्यंतच्या एकूण पावसाची: उदगीर ५८ (४९८), नागलगाव ५४ (३९४), मोघा २८ (४१९), हेर ३२ (३०४), वाढवणा ८८ (४४३), नळगीर ८१ (५३४), देवर्जन २६ (३४१), तोंडार २८ (२८६) असा पाऊस झाला आहे.