रेणापूर ( लातूर) : नगरपंचायत प्रशासन आणि पदाधिकारी यांच्या अनागोंदी व भ्रष्ट कारभाराची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेच्यावतीने जलकुंभवर चढून आंदोलन करण्यात येत आहे. प्रहारचे उपजिल्हाप्रमुख राजभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन तीन तासांपासून सुरु असून अद्याप प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही.
रेणापूर नगरपंचायत अंतर्गत सुरु असलेल्या विविध विकास कामांमध्ये नगरपंचायत प्रशासन व पदाधिकारी यांचा संगनमताने अनागोंदी कारभार सुरु आहे. शहरात करण्यात आलेले रस्ते, नाली, स्वच्छतागृहे आदीं कामे निकृष्ट दर्जाची असून संबंधितांची सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी प्रहार संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष राजाभाऊ राठोड यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. यात घरकुल योजनेअंतर्गत योग्य लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही, लाभार्थ्यांकडून शौचालयाच्या नावाखाली १२०००रु. कपात करतात, स्वच्छतेच्या नावाखाली लाखों रुपये खर्च करुनही उघडी गटारे, सांडपाण्यामुळे दुर्गंधी व घाणिचे साम्राज्य असल्याचे दिसून आले. त्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, त्याउलट संबंधित कंत्राटदारानेच नगरपंचायत सफाई कामगारांचे लाखों रुपये लाटल्याचा आरोप प्रहार संघटनेकडुन करण्यात आला आहे.
एकीकडे शहरातील नागरिकांच्या वापराकरिता उभारण्यात आलेली सार्वजनिक सभागृहे शोभेची वस्तु बनली असुन दुसरीकडे शहरातील क्रिडासंकुल मात्र कागदोपत्रीच पहावयास मिळते. सध्या शहरातील जलपुरवठा व बंद असलेली पथदिवे याकडेही प्रशासन व पदाधिकारी यांचे लक्ष नाही. त्यामुळे संबंधित कर्मचारी,पदाधिकारी,कंत्राटदार यांची सखोल चौकशी करुन दोषिंवर योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी आज सकाळी १०.३० वाजेपासून नगरपंचायत लगत असलेल्या जलकुंभवर चढून प्रहार संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनात जिल्हा उपप्रमुख राजाभाऊ राठोड, अमोल गोडभरले, विकास तपघाले, एकनाथ काळे, भगवान काळे, केदार साखरे, मुज्जम्मिल शेख, नेताजी तंगळे, गणेश राठोड, अक्षय चव्हाण आदींचा सहभाग आहे.