उदगीर तालुक्यातील हाळी येथील महावितरण कार्यालयांतर्गत हंडरगुळी, वाढवणा बु., वाढवणा खु., बेळसांगवी, गडसूर, चिमाचीवाडी, मोरतळवाडी, वडगाव, शेळगाव अशा ३२ गावांचा समावेश आहे. १० हजारांपेक्षा अधिक घरगुती वीजग्राहक असून, ४ हजारांपेक्षा जास्त कृषी वीजजोडण्या आहेत. दरम्यान, महिनाभरापासून हाळी हंडरगुळी गावात वीज पुवठ्याच्या डीपीत सातत्याने बिघाड होत होता. परिणामी, गावातील वीज तासन्तास गायब होत असे. तात्पुरती दुरूस्ती करून महावितरणचे कर्मचारी सेवा देण्याचा प्रयत्न करीत; परंतु अधिकच्या भारामुळे डीपी सातत्याने जळत असे. सततच्या या समस्येमुळे हाळी हंडरगुळी येथील वीज ग्राहक त्रस्त झाले होते. गावात चांगल्या दर्जांच्या डीपी बसविण्यात याव्यात, अशी मागणी युवा सेनेच्यावतीने उदगीर येथील कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती.
दरम्यान, विजेचा सातत्याने खेळखंडोबा, हाळी हंडरगुळीतील ग्राहक त्रस्त, असे ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित झाले होते. त्याची दखल घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी हाळी व हंडरगुळी येथे डीपी बसवून दोन्ही गावांतील वीज पुरवठा सुरळीत केला आहे. त्यामुळे ग्राहकांतून समाधान व्यक्त होत आहे.
सहायक अभियंत्याची नियुक्ती करावी...
येथील महावितरण कार्यालयास कायमस्वरूपी सहायक अभियंता नसल्याने ग्राहकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाने त्याची दखल घेऊन कायम स्वरूपी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.