लातूर शहराला मांजरा प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, धरणावरील वीजपुरवठा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे खंडित झाला आहे. बुधवारपासून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासंदर्भात महावितरणचे कर्मचारी काम करीत आहेत. परंतु प्रकल्प क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने वीजपुरवठ्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी, लातूर शहराला पाणी घेता आले नाही. तसेच हरंगुळ सब स्टेशनमधीलही लग्ज तुटून पडल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून लातूर शहरात निर्जळी आहे. जोपर्यंत वीज दुरुस्तीचे काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत पाणीपुरवठा पुरवठा बंद राहणार असण्याचे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कलवली यांनी सांगितले.
पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले
लातूर शहराला आठ दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, वीजपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये धरण क्षेत्रावर बिघाड झाला आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित असल्याने शहराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. दोन दिवस पाणीपुरवठा बंद झाला असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून तांत्रिक बिघाड दुरूस्त झाल्यानंतरच पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.