किनगाव येथे शाळा, महाविद्यालये आहेत, तसेच खाजगी शिक्षण संस्थाही आहेत. गावातील सर्वांत जुनी शाळा ही जिल्हा परिषद प्रशाला आहे. या प्रशालेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग असून, ३०२ विद्यार्थी आहेत. त्यामध्ये १७७ मुले आणि १२५ मुली शिक्षण घेत आहेत. या मुलांना शिकविण्यासाठी माध्यमिक स्तरावरील दोन शिक्षक, पदवीधर दोन व प्राथमिक विभागात चार शिक्षक, एक कारकून व एक शिपाई, असे एकूण दहा कर्मचारी कार्यरत आहेत. माध्यमिक विभागामध्ये तीन शिक्षकांची पदे मंजूर असून, एक पद रिक्त आहे. प्राथमिक पदवीधरची तीन पदे मंजूर असून, एक पद रिक्त आहे, तर प्राथमिक विभागामध्ये पाच पदे मंजूर असून, एका शिक्षकाचे निधन झाल्याने एक पद रिक्त आहे. शिपायांची दोन पदे मंजूर असून, एक पद रिक्त आहे. त्यामुळे इतर शिक्षकांवर कामाचा ताण वाढला आहे.
या प्रशालेत प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले मुख्याध्यापक हे पदोन्नतीने उदगीर तालुक्यातील दावणगाव येथील प्रशालेत वर्ग-२ पदी नियुक्त झाले आहेत. त्यामुळे येथील प्रशालेतील मुख्याध्यापकाचे पद रिक्त आहे. पदोन्नतीने जाणाऱ्या मुख्याध्यापकाने शाळेतील एका वरिष्ठ शिक्षकांकडे आपला पदभार दिला; पण पदभार घेतलेल्या शिक्षकास मुख्याध्यापकपदाची मान्यता माध्यमिक शिक्षण विभागाने देणे आवश्यक आहे; परंतु अद्यापही ती मान्यता नसल्यामुळे शिक्षकांच्या वेतन बिलावर स्वाक्षरी कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील शिक्षकांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून रखडले आहे.
कायम मुख्याध्यापकाची मागणी...
शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीनेही एका निवेदनाद्वारे शिक्षण विभागाकडे कायमस्वरूपी मुख्याध्यापक मिळावा म्हणून मागणी केली आहे, तसेच रिक्त पदे भरून विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणीही केली आहे; परंतु अद्यापही कायमस्वरूपी मुख्याध्यापक प्रशालेस नियुक्त करण्यात आला नसल्याचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष करणसिंह ठाकूर यांनी सांगितले.