प्रकाश नगरात अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
लातूर : बार्शी रोडवरील प्रकाश नगर भागात अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. दोन दिवसांच्या पावसाने रस्त्यावर खड्डे असल्याने पाणी साचले आहे. वाहनधारकांनाही यासाठी कसरत करावी लागत आहे. शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढल्याने रस्त्यावरच पाणी साचत आहे. कमीत कमी यावर मुरूम टाकून रस्ता स्वच्छ करावा, अशी मागणी प्रकाश नगरातील नागरिकांनी केली आहे.
शहरातील मुख्य चौकात वाहतुकीची कोंडी
लातूर : शहरातील अनेक मुख्य चौकात गुरुवारी सकाळ-सायंकाळच्या वेळेत वाहतुकीची कोंडी दिसून आली. शहरातील शिवाजी चौक, पीव्हीआर चौक, रेणापूर नाका, राजीव गांधी चौक, गंजगोलाई, नंदी स्टॉप या भागात गुरुवारी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होती. अनेकवेळ वाहनधारकांना या कोंडीमुळे ताटकळत उभारावे लागले. वाहतुकीची कोंडी कमी करावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
सिकंदरपूर येथे लसीकरणास प्रतिसाद
लातूर : खोपेगाव उपकेंद्रामार्फत सिकंदरपूर येथील जिल्हा परिषद शाळेत लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यात तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. माझे गाव-माझी जबाबदारी या संकल्पनेतून १८ वर्षांवरील युवक व नागरिकांना कोरोनावरील लस देण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक गणेश कदम, वर्षाराणी आजळे, डॉ. प्रताप इगे, टी.डी. चेरले, डॉ. चंद्रशेखर जाधव, माधव गंभिरे, पिराजी ईटकर, आर.एम. चलमले, उद्धव पाटील, सुरेश ईटकर यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
सेवानिवृत्तीबद्दल यशवंत कांबळे यांचा सत्कार
लातूर : आचार्य विनोबा भावे प्राथमिक विद्यालयातील मुख्याध्यापक यशवंत कोंडिबा कांबळे यांचा सेवानिवृत्तीबद्दल नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशवंत कांबळे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
दोन दिवसांच्या पावसाने शेतकऱ्यात समाधान
लातूर : शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. यामुळे पेरणी केलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. शहरासह बाभळगाव, शिवणी, भुसणी, हरंगुळ, जेवळी यासह अन्य परिसरात पाऊस पडल्याने पिके तरारत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडल्याने पिकांना एकप्रकारे जीवदान मिळाले आहे.