शासनाकडून पावसाळा सुरू झाला की, दरवर्षी झाडे लावण्याचे उदिष्ट ग्रामपंचायतीला दिले जाते. झाडाची लागवड ही केली जाते. मात्र, ही झाडे जगण्यापेक्षा सुकून जाण्याचे प्रमाण अधिक असते. लावलेले वृक्ष टिकत नाहीत. त्याची म्हणावी तशी जोपासना केली होत नाही. यंदा जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयसिंह सोळुंके यांनी प्रत्येक विभागाच्या स्वतंत्र बैठका घेऊन वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले होते. आनंद घनवन (मियावाकी) योजनेतून निलंगा पंचायत समितीने उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड केली आहे. एक बाय एक फूट खड्डा खोदून तीन प्रकारचे वृक्ष लावण्यात आले असून, एक वृक्ष जोमात वाढणारे, एक मध्यम व एक कमी अशा जातीच्या वृक्षाची निवड करण्यात आली आहे. अशा लागवड पध्दतीमुळे ज्यामध्ये सूर्य प्रकाश खेचण्याची स्पर्धा लागते व झाडे जगण्याची टक्केवारी वाढते.
येथील पंचायत समितीला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ५०० झाडे प्रति साईट लावण्यासाठी ५० ठिकाणे दिली होती. गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने ७५ साईट वरती वृक्षारोपण करण्यात आले असून, प्रत्येक साईट वरती कमीत कमी ५०० ते ३ हजार झाडे लावली आहेत. असे एकूण ८५ हजार झाडे लावली आहेत. प्रत्येक ठिकाणी ड्रिप एरिगेशन करून पाण्याची सुविधा केली आहे.
यामध्ये तालुक्यातील मसोबावाडी, झरी, आंबेगाव-मसलगा, येळणूर, सरवडी, कासारसिरशी, लांबोटा, औराद शहाजानी, तगरखेडा, सावरी, नदीहत्तरगा, नणंद, मदनसुरी यासह आदी गावांचा समावेश आहे.
झाडे जगवली नाही तर कारवाई...
प्रत्येक ठिकाणी पाण्याची सुविधा करून वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामपंचायतीला त्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित विभागांनी यंदा लागवड केलेली झाडे जर नाही जगवली तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी दिली.
कॅप्शन : राज्य शासनाच्या आनंद घनवन योजनेतून निलंगा पंचायत समितीला दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्षारोपण केले आहे. या लागवडीची पाहणी उपमुख्य कार्यकारी आधिकारी उदयसिंह सोळुंके, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी केली.