अहमदपूर : सततच्या आंदोलनामुळे महामार्ग प्राधिकरणाने येथील महामार्गावरील खड्डे बुजविले. मात्र, अवजड वाहन धावल्याने पुन्हा खडी उघडी पडली आहे. त्यामुळे महामार्गास पूर्वीची अवस्था आली आहे. परिणामी, वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. दरम्यान, उपजिल्हाधिकाऱ्यांनी या स्थितीची पाहणी केली आहे.
लातूर-नांदेड हा महामार्ग अहमदपूर शहरातून जातो. या महामार्गावरील खड्डे पाहता हा महामार्ग आहे की, खेडेगावचा रस्ता अशी स्थिती आहे. दुरुस्तीसाठी दोन महिन्यांपासून निवेदने देऊन आंदोलने करूनही महामार्ग प्राधिकरणने लक्ष दिले नाही. मात्र, आता संबंधित गुत्तेदाराला आदेश देण्यात आल्याने संबंधित गुत्तेदाराने केवळ मोठ्या खड्ड्यांमध्ये खडी टाकून डागडुजी केली. परंतु, अवजड वाहनांच्या रहदारीमुळे खड्ड्यांमधील खडी उघडी पडली आहे. परिणामी, रस्त्यास पूर्वीची स्थिती आली आहे. त्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे.
१५ दिवसांपूर्वी याबाबत आमदार बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुनील पाटील यांना प्रत्यक्ष जागेवर आणून खड्डे भरण्याच्या दर्जाविषयी विचारणा करून तक्रार केली होती. मात्र, महामार्ग प्राधिकरणच्या कामाच्या दर्जात फारसा फरक पडला नाही. केवळ २० कि.मी.वरील खड्डे बुजविण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागतो. उर्वरित ठिकाणचे लवकर खड्डे बुजविले जातात. त्यामुळे संभ्रमावस्था आहे. दरम्यान, टाकलेल्या खडीवर काही दुचाकीस्वार घसरून पडल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.
गुत्तेदाराने अहमदपूर ते शिरूर ताजबंद मार्गावरील काही खड्डे बुजविले असले तरी अहमदपूर सांगवी मार्गावरील खड्डे अजून आहेत. याबाबतच्या तक्रारी प्राप्त होताच उपजिल्हाधिकारी जीवन देसाई यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच दर्जाविषयी गुत्तेदारास सूचना केल्या. तसेच शिरूर ते चापोली या मार्गावर अजूनपर्यंत काम केले नाही. ७७ कि.मी.पैकी ३५ कि.मी.चे काम अजूनही शिल्लक आहे.
खडी टाकल्यानंतर डांबरीकरण...
महामार्गावर एक ते दीड फुटाचे खड्डे पडले आहेत. ते बुजविण्यासाठी अगोदर खडी टाकण्यात येत आहे. दोन दिवसांनंतरचा डांबरीकरण करून रस्ता तयार करण्यात येणार असल्याचे गुत्तेदाराकडून सांगण्यात आले.
७७ पैकी ३५ कि.मी.चे काम...
गुत्तेदाराने ७७ पैकी केवळ ३५ कि.मी.चे काम पूर्ण केले आहे. माळेगाव ते चापोली दरम्यानचे खड्डे अद्यापही आहेत. रस्त्याच्या दर्जाविषयी पाहणी करून महामार्ग प्राधिकरणला सूचना मी स्वतः सूचना केल्या आहेत. दर्जा सुधारणाविषयी पत्रव्यवहार केला असल्याचे उपजिल्हाधिकारी जीवन देसाई यांनी सांगितले.